रविवार, ३ मे, २०२०

कोरोनाचा बाऊ (बालगीत)

खेळायला जाताना,
नको म्हणते जाऊ।
आई म्हणते बाहेर आहे
कोरोनाचा बाऊ।।

कोरोना कोरोना,
काय आहे आई?
इवलासा विषांणू
जीव कसा घेई?

आई म्हणते विषाणू,
जीव घेत नाही।
दुर्लक्ष आपल्याला,
संकटात नेई।।

२० सेकंड स्वतःचे,
हात स्वच्छ धुवू।
घराबाहेर पडताना,
मास्क लावून जाऊ।।

गर्दीच्या ठिकाणी,
जाणे आपण टाळू।
सर्दी खोकला असेल तर,
टेस्ट करून घेऊ।।

पोलीस, डॉक्टर मामांचे,
ऋण कसे फेडू।
घरात गप्प बसून,
कोरोनाशी लढू।।

सरकारने सांगितलेले,
नियम सगळे पाळू।
कोरोनाला हरवून,
देश उभा करू।।

कोरोनाला हरवून,
देश उभा करू।।

कोरोनाला हरवून,
देश उभा करू।।

शनिवार, २ मे, २०२०

बाबाजींचे ज्ञान

वचन १ -
आयुष्यात खूपदा आपल्याला कठीण प्रसंगांना तोंड द्यायला लागते. अश्या वेळी नशिबाला दोष देत बसू नका. नशीब अशी कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात नाहीये. जे काही आहे, ते आहे आपण घेतलेल्या निर्णयांचे परिणाम, आणि हे आपल्याला स्वीकारावेच लागेल. स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्या, आणि झालेल्या चुका उगाळत न बसता, पुढे चालत रहा, आयुष्य जगत रहा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. अश्या वेळी "पक पक पकाक" सिनेमा मधील एक सुंदर वाक्य सांगावेसे वाटते, "आयुष्य खूप सुंदर आहे मित्रानो, त्याला आणखी सुंदर बनवूया".

वचन २ -
नियतीचा खेळ खूप विचित्र असतो. कधी-कधी एका क्षणात राजाचा रंक होतो, तर कधी क्षणात रंकाचा राव होतो. काही लोकांच्या आयुष्यात भरभरून सुख असतं, तर काही लोकांकडे सर्व काही असूनही त्यांचे आयुष्य अपूर्ण असतं. अशा वेळी व.पू. म्हणतात, "नियती ज्यावेळी एखाद्याच आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, ह्याच उत्तर पण नियती जवळच असतं". आयुष्यात कधी-कधी आपल्या समोर असे काही कठीण प्रसंग येतात कि, नियतीपुढे आपल्याला सपशेल हार मानावी लागते. पण अशा प्रसंगी खचून जाऊन चालत नाही. लक्षात ठेवा, "नियती जेव्हा आपल्या हातातून काही हिरावून घेते, तेव्हा त्याच्या पेक्षा मौल्यवान असं काही तरी देण्यासाठी किंवा आपल्या हातून काही तरी चांगलं काम करवून घेण्यासाठी, ती आपला हात रिकामा करत असते". अश्याच एका नियतीच्या खेळाची गोष्ट घेऊन येत आहे लवकरच .

वचन ३ -
प्रेमाचं नातं हे आपुलकी, काळजी आणि विश्वास या ३ बंधांनी घट्ट विनले गेलेले असते. यातील काही बंध सैल झालेले असतील तर संवादाच्या मार्गाने आपण ते पुन्हा घट्ट करू शकतो.
पण यातील एकहि धागा तुटला असेल तर या नात्यापासून दूर गेलेले केव्हाही चांगले असते. तुटलेल्या धाग्यांनी ठिगळ लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्या नात्याच्या सुंदरते पेक्षा ठिगळ जास्त उठून दिसू शकते.

वचन ४ -
आयुष्य खरोखरच खूप साधी, सोपी आणि सरळ गोष्ट आहे. पण आपला मी-पणा, अहंकार, दिखावा, खोटेपणा, चढाओढ, फक्त आणि फक्त घेण्याची प्रवृत्ती यांमुळे आपण ते गुंतागुंतीचे करून ठेवतो. मी-पणा, अहंकार न ठेवता स्वतःचे स्वत्व जोपासा. स्वतःची प्रगती करा पण मुद्दाम कोणाच्या अधोगतीस कारण होऊ नका. कोणताही दिखावा आणि खोटेपणा न करता, आपण जे आहोत जसे आहोत त्यात सुखी आणि समाधानी राहा. फक्त घेण्याची प्रवृत्ती न दाखवता, दातृत्वाचाही अनुभव घ्यावा. त्यासाठी फक्त पैश्याचेच दान करायला पाहिजे असं
नाही. आपले ज्ञान, अनुभव, निखळ मानाने दिलेला सल्ला या गोष्टी पैश्याच्या दातृत्वापेक्षा खूप मोठ्या आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे साधी, सोपी, सरळ विचारसरणी आणि निखळ मन यांमुळे सुखी आणि समाधानी आयुष्य जगता येते.

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावेत.
कवी ---- विंदा करंदीकर