रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

प्रिय चहास ...

प्रिय चहास,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

पत्रास कारण कि, तसं पाहिलं तर तुझी आणि माझी साथ अगदी लहानपासूनची आहे, पण आभार प्रदर्शनाची संधी कधी मिळाली नाही. किंबहुना सगळ्यात जवळच्या असणाऱ्या तुझ्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष झालं आमचं. पण कधीही न करण्यापेक्षा, उशिरा का होईना ते आभार प्रदर्शन करणे श्रेयस्कर आहे (Better late than never / देर आये दुरुस्त आये) नाही का? तर त्यासाठीच हा सगळा पत्रप्रपंच 😊

दररोज सकाळी तू मिळालास कि दिवसाची सुरुवात कशी ताजी तवाणी होते, जणू उगवतीच्या सूर्यदेवाने गोड दिवसाची गोड सुरुवात करण्यासाठी दिलेला आशीर्वादच. दररोज सकाळचा नित्यक्रम असल्यामुळे, तुझ्या या गोष्टीच तितकंसं महत्त्व समजत नाही आम्हाला कधी. पण कधी काळी हा नित्यक्रम चुकला तर दिवसाची सुरुवातच चुकल्या चुकल्या  सारखी होते, आणि तेव्हा आम्हाला समजते कि दिवसाची सुरुवात गोड करण्यासाठी तू किती महत्वाचा आहेस ते. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, चहा टपऱ्या सगळं काही बंद होत. नोकरीच्या ठिकाणी एकटं राहत असल्यामुळे, सुरुवातीचे काही दिवस सकाळी तुझी भेट न होण्याचा हा कटू अनुभव मी  घेतला आहे. पण नंतरच्या काळात ऑनलाईन अन्न वितरण (फूड डिलिव्हरी) करणाऱ्या कंपनीच्या मदतीने तुझ्या-माझ्या भेटीची सोय झाली, तेव्हा कुठे थोडं हायसं वाटलं. कामावरून घरी गेलो किंवा बहरून दमून घरी गेल्या नंतर, तुझा एक कप मिळाला कि मन कसं प्रफुल्लित व्हायला होत.

तुझ्यातील गोडवा नातेसंबंधामध्ये उतरवून, नातेसंबंधामध्ये गोडवा वाढवण्याचे काम तर तू कित्येक वर्षांपासून करत आहे. उपवर वधू-वरांच्या ओळखीची सुरुवात तर चहा-पानाच्या कार्यक्रमापासूनच होते, सोबतीला पोहे असतात. आपल्या घरी कुणी पाहुणे किंवा मित्र मंडळी आली तर त्यांचे स्वागत तुझ्या पासून च होते. आपण बाहेर असताना कुणी ओळखीचे भेटलं कि "चला चहा घेऊ" असा शब्द आपसूकच निघतो. अगदी विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक असा दोघांचा एकत्र चहापान कार्यक्रम ठेवलेला असतो. अधिवेशनात कोणकोणते मुद्दे चर्चेसाठी यायला हवे याची चर्चा करण्याच्या उद्देशाने चहापान कार्यक्रम आयोजित केला जातो. म्हणजे एकूणच राज्याचा विकास आणि सत्ताधारी-विरोधक यांच्या मध्ये एक सलोख्याचे वातावरण निर्माण करणे, या कामा मध्ये सुद्धा तू एक छोटीशी भूमिका पार पडत असतोस (हल्ली विरोधक मग ते कुणीही असो, नेहमी या कार्यक्रमाचा बहिष्कार करत असतात तो भाग वेगळा). प्रसारमाध्यमांनीही "चाय पे चर्चा" म्हणत वेगळंवेगळ्या क्षेत्रातील लोकांना एकत्र अनंत अनेक वादविवाद (Debate) घडवून आणले आहेत. तर तात्पर्य काय कि क्षेत्र कोणताही असो, नातेसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनेही तू नेहमीच महत्वपूर्ण भूमिका वठवत आला आहेस.

तुला इंग्रजानी भारतात आणला, असा गैरसमज आपल्याकडे आहे. पण भारतात इंग्रज येण्याच्या खूप आधी पासून तुझं अस्तित्व होत, असा उल्लेख इतिहासात आढळतो. तुझं स्वरूप फक्त काही ठिकाणी वेगळं होतं आणि तुझा व्यावसायिक वापर होत नव्हता. इंग्रजानी फक्त तुझे व्यावसायिक उत्पादन सुरु केले आणि मोठ्या प्रमाणात तुझ्या लागवडीस प्रोत्साहन दिले. भारतात तर तुझे खूप सारे वेगळे वेगळे प्रकार आढळतात - साधा चहा, काळा चहा (ब्लॅक टी), काश्मिरी कावा, गुळाचा चहा, मसाला चहा आणि याच्या व्यतिरिक्त हि खूप प्रकार असतील जे मला माहिती पण नाहीत. प्रत्येकाच्या आवडी-निवडी आणि भौगोलिक परिस्थिती नुसार लोकांनी तुला वेग वेगळी चव दिली आणि प्रत्येक परिस्थिती आत्मसात करून तू त्यांना तुझा आनंद देत राहिलास आणि अजूनही देत आहेस आणि यापुढेही देत राहशील.

पार्ले-जी बिस्कीट सोबत चहाच एक अनोखं नातं आहे, पण इतरहि अनेकांसोबत तू चांगलाच मिसळून जातोस. बिस्कीट, खारी, टोस्ट यांच्या सोबतच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात चहा आणि चपाती यांचही अनोखं नातं जपलं जात. पुण्या सारख्या किंवा इतरही मोठ्या शहरात जिथे मोठ-मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांच्या बाहेर चहा सोबत सुट्टा (सिगारेट) असं एक अनोखं नातं पाहायला मिळतं, हे संयोजन कामामुळे आलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी कामात येत. तर सांगायचं उद्देश्य हा कि, शहरी-ग्रामीण, श्रीमंत-गरीब, श्रमिक कामगार-अधिकारी असा कोणताही भेदभाव न करता सगळ्यांसोबत मिसळण्याची तुझी किमया सर्वानाच जमते असं नाही.

तुझा गर्भश्रीमंत समजला जाणारा चुलत भाऊ कॉफी आणि आमचं कधी जमलं नाही. तसं पाहिलं तर कॉफी हे श्रीमंत वर्गात मोडणारे पेय आहे, पण तू (चहा) गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाना आधार देतोस. तुझा तिरस्कार करणारे लोक, काही वेळा काहीही कारण काढून चहा कसा वाईट आणि चहा का नाही पिला पाहिजे याचा बाऊ करतात. पण हाडाच्या चहाप्रेमींना त्याचा कधी फरक नाही पडला, चहाने येणारी तरतरी त्यांना काय समजणार आहे म्हणा. आम्हा हाडाच्या चहाप्रेमींसाठी चहा हे फक्त पेय नसून तो एक धर्म आहे. अमृततुल्य चहा या नावाने तर चहाची तुलना आम्ही डायरेक्ट अमृताशी केलेली आहे. अमृततुल्य कॉफी असं काही आता पर्यंत तरी कुठेही वाचनात किंवा ऐकिवात आलेलं नाही आमच्या. "कॉफी आणि बरच काही" असं म्हणून कॉफीचा मिजास वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही आम्हा चहाप्रेमींचा "चहासाठी काय पण, कधी पण आणि कुठे पण" हा रांगडा बाणा कुणालाही सोसवणारा नाही.

असो, आम्हा चहा प्रेमींसाठी तुझी महती सांगावी तेवढी कमीच आहे. आमच्या आयुष्यातील तुझे स्थान अढळ होतं, आहे आणि यापुढेही राहील. काळजी नसावी. तशीही आता माझी चहाची वेळ झालीच आहे, त्यामुळे जाता जाता काही ओळी ऐकवाव्या वाटतात - 

हमेशा तुमको चाहा, ओ चहा ☕ चहा ☕ चहा ☕
और चाहा कुछ भी नहीं
तुम्हे दिल ने है पूजा 
और पूजा कुछ भी नहीं

तुझाच,
एक चहाप्रेमी
(जिथे टी☕, तिथे मी 👨 )