रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

प्रवास - एका थरारक वाळणावरचा

ऑफिस मधील सहकारी - ज्यांच्या सोबत आपण आठवड्यातले ५-६ दिवस दररोज ९-१० तास वेळ घालवतो ते आपले ऑफिस मधील सहकारी हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात. पण व्यावसायिक नात्यासोबतचं जर त्यांच्या सोबत आपलं मित्रत्वाचं नातं असेल तर काम करण्याचा आणि जगण्याचा आनंद द्विगुणित होऊन जातो. छोट्या-मोठ्या ट्रिप्स, ट्रेकिंग-हायकिंग, मूवी अश्या गोष्टी सोबत हे नातं अधिकचं घट्ट होत जातं, आणि ऑफिसमध्ये आपल्याला असे चांगले सहकारी-मित्र मिळणे हि थोडी भाग्याचीच गोष्ट असते.

आमच्या ऑफिस मध्ये निशांत, राघव, वरूण, विनोद, आयुश आणि मी अशी आमची ६ जणांची टीम. ऑफिस मधले बाकीचे सहकारी आमच्या या टीमला  "टोळी" म्हणायचे. कारणही तसाच होतं, जशी वात्रट लोकांची एक टोळी असते, तशीच आम्ही ६ जण ऑफिस मध्ये कामाबरोबरच दंगा-मस्ती करण्यात नेहमी पुढे असायचो. त्यामुळे बाकीचे सहकारी आमच्या या टीमला "टोळी" म्हणायचे.

आम्हीहि छोट्या ट्रिप्स, ट्रेकिंग-हायकिंग, मूवी असं सगळं एकत्र प्लान करायचो. असाच आमचा एक प्लान बनलेला "गोवा ट्रिप". तर हि आमची एक अशी ट्रिप होती जी खूप दिवसापासून पुढे-पुढे जात होती. ३-४ वेळा सगळी तयारी होऊन आमचा प्लान आयत्या वेळी रद्द झालेला. कधी निशांतच्या बहिणीच्या लग्न होत, तर कधी वरूण आयत्या वेळी खूप आजारी पडला होता. तर सांगायचं मुद्दा असा आहे कि आमची हि "गोवा ट्रिप" काही केल्या पूर्णत्वास येत नव्हती. मध्येच कधी ऑफिसला सलग ३-४ दिवस सुट्टी मिळाली कि विषय निघायचा "चलो गोवा चालते है", पण आयत्या वेळी काही तरी कारण आडवं येऊन आमचा तो प्लान रद्द व्हायचा. कधी-कधी चर्चा करत असताना आम्हीच आमच्या या परिस्थितीबाबत हसायचो आणि म्हणायचो, "आपल्या गोवा ट्रिप ला इतकी कशी काय विघ्न येत आहेत, श्रावणात सत्यनारायणाची पूजा घालून, देवाला साकडं घालायला लागतय  वाटतं गोवा ट्रिप साठी."

तर अशीच हि ट्रिप पुढे-पुढे जात २ वर्षे निघून गेली. आम्ही सगळे लोक अमेरिकेच्या क्लायंट साठी काम करत होतो, त्यामुळे आमचा ५ दिवसाचा आठवडा असायचा, शनिवार-रविवार सुट्टी असायची. तसेच अमेरिकेत फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी "प्रेसिडेंट डे" ची सुट्टी असते म्हणून मग आम्हाला पण सुट्टी होती. त्यामुळे ऑफिसला शनिवार-रविवार-सोमवार अशी ३ दिवस सुट्टी होती. पुन्हा एकदा "चलो गोवा चालते है" हा विषय निघाला. सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा करून, गोवा ला जायचा प्लान पक्का केला. शुक्रवारी सगळ्यांनी सुट्टी घेऊन, शुक्रवार-शनिवार-रविवार-सोमवार असा ४ दिवसांचा गोवा प्लान ठरला. गुरुवारी रात्री पुण्याहून निघायचं रात्रीत गाडी चालवत सकाळ पर्यंत गोवा ला पोचायचं तिकडे मग शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी दुपारपर्यंत गोवा मध्ये फिरायचं-मजा करायची सोमवारी दुपारी गोवाहून निघायचं म्हणजे सोमवारी रात्री पर्यंत पुणे मध्ये माघारी पोहोचू. रात्री आराम करून मंगळवारी ऑफिसला जाता येईल असा सगळा आमचा प्लान होता. आम्हाला जवळ जवळ सगळ्यांनाच कार चालवता येत होती त्यामुळे जाताना आणि येताना थोडं थोडं सगळ्यांनी गाडी ड्राइव्ह करायचं असं ठरलं होत. झूमकार(Zoomcar) मधून आम्ही इनोव्हा गाडी बुक केली. तब्बल २ वर्षांनी आमचा गोवा ला जायचा प्लान पूर्णत्वास येत होता.

गोवा ला जायचा दिवस उजाडला. संध्याकाळी ८ वाजता निशांत गाडी घेऊन आला, सगळ्यांना घेऊ पर्यंत पुन्हा पुढचा एक-दीड तास गेला. रात्री १० च्या सुमारास आम्ही पुण्यातून बाहेर पुणे-बेंगलोर महामार्गावर होतो. पहिले निशांत, नंतर राघव आणि मग आयुश असे ड्राइव्ह करत आम्ही कोल्हापूरच्या पुढे कागल नावाच्या गावापर्यंत पोचलो. ज्यावेळी एक जण ड्राईव्ह करत असेल तर बाकीचे सगळे झोपून जात असत, जेणेकरून गाडी चालवताना कुणालाहि झोप येऊ नये. कागलला एका टपरीवजा होटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलो, तेव्हा सगळे जागे झाले, अर्धवट झोपेतून उठून, कसं तरी तोंड खळबळून, सगळ्यांनी चहा घेतला. राघव, निशांत आणि वरुण यांनी चहा बरोबर सिगारेट शिलगावली. एव्हाना रात्रीचे २ वाजले होते.  १०-१५ मिनिटे त्या ठिकाणी थांबून आम्ही पुढच्या वाटेल लागलो. आता गाडी मी ड्राईव्ह करत होतो, बाकीचे सगळे पुन्हा झोपून गेले.

तिथून पुढे कर्नाटक बॉर्डर पार करून निपाणी मधून आम्ही आंबोली घाटाकडे जाऊ लागलो. साधारण पुढच्या एका तासात आम्ही आंबोली घाटात होतो. रात्रीचे ३ वाजले होते. पूर्ण रस्ता निर्मनुष्य होता, मध्येच एखादी-दुसरी गाडी येता-जाताना दिसत होती.

आंबोली घाटाविषयी मी चांगल्या-वाईट अश्या खूप गोष्टी ऐकून होतो. १)आंबोली धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय. २)तसेच मध्यंतरी पोलीस कस्टडी मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्या नंतर आंबोली घाटात मध्ये नेऊन पुरावे नष्ट करण्याचे एक प्रकरण खूप गाजले होते. ३)तसेच आंबोली घाटामध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांची बातमी अधून मधून धडकतच असते.

आंबोली घाटामध्ये खूप सारे अपघात होतात, आणि अश्या आकस्मित निधनाने मृत्यू पावलेल्या लोकांचे अतृप्त आत्मे तिथेच वास्तव्यास आसतात, वारंवार तिथे होणाऱ्या अपघातांना हे अतृप्त आत्मेच कारणीभूत आहेत, अश्या गोष्टी मला ऐकून माहिती होत्या.

जिथे आंबोली घाट चालू झाला तिथे गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात मला एक पाटी दिसली "पुढे घाट चालू होत आहे, नागमोडी वळणे, वाहने सावकाश चालवा". ती पाटी पाहिल्या नंतर मागच्या ऐकलेल्या सगळया गोष्टी माझ्या मनात तरळून गेल्या, माझ्या मनात एक प्रकारची धाक-धुकं चालू झाली. एक तर रात्रीच्या वेळी घाटात गाडी चालवण्याचे दडपण, त्यामध्ये पूर्ण रास्ता निर्मनुष्य दिसत होता, आणि त्याउपर म्हणजे त्या ऐकीव गोष्टींचे दडपण. गाडीमध्ये असणाऱ्या लोकांपैकी कुणी जाग आहे का हे पाहण्याचा मी प्रयत्न केला, ज्यामुळे माझ्या मनात निर्माण झालेली भीती थोडीशी कमी होईल. ड्राइवर सीटला लागूनच असलेल्या सीट वर राघव बसला होता. मी त्याच्या कडे एक कटाक्ष टाकला तर तो निद्रिस्त झालेला होता. मागे बसलेल्या लोकांचे तर घोरण्याचे आवाज मला येत होते, त्यामुळे त्यांच्या पैकी कुणी जाग असण्याचा संबंधच नव्हता.

हताश होऊन मी पुढे पाहून गाडी चालवू लागलो. जसं-जसं पुढे जाऊ लागलो तसं-तसं जंगल एकदम गर्द होऊ लागले. एक भयाण शांतता होती सगळीकडे. आमच्या गाडीचा आवाज आणि रात्रीच्या वेळी किरकिरणाऱ्या किरकिर किड्यांचा आवाज त्या गर्द जंगलराईमधल्या त्या भयाण शांततेला भेदत होता. त्या भयाण शांततेबरोबरच माझ्या मनातला अदृश्य शक्तींचा विचार अजूनच गडद होत चालला होता. असं म्हणतात ना कि, एखाद्या गोष्टीचा खूप विचार केला तर ती गोष्ट आपल्याला खारी वाटू लागते, माझ्याही मानाचं तसेच काहीतरी झालं होत.

असेच सगळे विचार आणि मनाची चलबिचल चालू असताना घाटाच्या एका वळणाला मला असे वाटले कि माझ्या गाडी समोर काही ३-४ लोक उभी आहेत, पण जेव्हा गाडीच्या दिव्यांच्या उजेडात मला त्यांचे चेहरे दिसले तेव्हा भीतीने माझ्या अंगावर सर्रर्रर्रकन काटा उभा राहिला. सगळ्यांचे चेहरे एकदम विद्रुप दिसत होते. मूवी मध्ये जे झोंबी दाखवतात ना त्यांच्या सारखेच होते ते सगळे लोक. ते आमच्या गाडीच्या समोर आले आणि आता आमची गाडी त्यांना धडकणार म्हणून मी डोळे गच्चं मिटून घेतले. क्षणभरानंतर मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिथे कोणीही नव्हते. आमची गाडी कुणालाही धडकली नव्हती. हे सगळं काय होत हे जाणून घेण्यासाठी गाडीच्या आरश्यामध्ये  मागचं काही दिसत आहे का ते पाहण्याचा मी प्रयत्न केला. पण मला मागच्या बाजूला काहीही दिसलं नाही. भीतीपोटी निर्माण झालेला माझ्या मनाचा भास होता तो निव्वळ.

या सगळ्या गडबडीमध्ये माझं पुढे लक्षच नव्हतं आणि गाडी तशीच पुढे चालू होती, पुढे एक तीव्र वळण होते, मी कसं तरी गाडी कंट्रोल करून गाडी वळणाला वळविली पण तोवर समोरून एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. आता गाडी ट्रक वर आदळणार म्हणून मी गाडी थोडीशी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या गडबडीमध्ये माझा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी थेट समोर असलेल्या दरीमध्ये कोसळली. आदळत-आपटत गाडी दरीमध्ये खाली जात होती. बाकीचे सगळे लोक जे गाढ झोपेत होते, त्यांना काय होत आहे ते समजलेच नाही. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी बेशुद्ध झालो.

जेव्हा मला जाग आली तेव्हा पाहिले तर गाडी खोल दरीमध्ये कशाच्या तरी आधाराने अधांतरीच लटकत होती. आजूबाजूची परिस्थिती खूपच गंभीर होती. माझ्या पायाला खूप मार लागला होता, खूप रक्त गेले होते. बाजूच्या सीटवर बसलेला राघव अर्धवट शुद्धीत होता. त्याच्याही हाता-पायाला मार लागून रक्त गेले होते. सगळीकडे रक्ताचा सडा पसरला होता. राघवला आणि मला सीटबेल्ट लावल्यामुळे डोक्याला मार लागला नाव्हता. बाकीच्या लोकांच्या डोक्याला खूप मार लागला होता, त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीच शुद्धीत नव्हतं. मी बाहेर पाहून थोडंसं कुठे आहोत हे अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, तर गाडीच्या चालू-बंद होणाऱ्या दिव्यांवरून मला समजले कि आमची गाडी एका मध्यम आकाराच्या झाडाच्या आधाराने अधांतरी लटकत आहे. पण एवढ्या मोठ्या आघाताने ते झाड पण आता जास्त वेळ तग धरू शकणार नाही हे मला दिसत होत.

मी थोडस हालून बाहेर जायला येत आहे का याचा प्रयत्न केला, पण या सगळ्याचा पारीणाम असा झाला कि गाडीच्या होणाऱ्या हालचालींमुळे ते झाड आणखी कमकुवत होऊ लागले, त्यामुळे मी हालचाल थांबवली. तरीही थोड्याच वेळात कर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा झाड तुटण्याचा आवाज झाला आणि आमची गाडी पुन्हा त्या खोल दरीत कोसळू लागली. आता यातून आपली सुटका नाही हे मला समजलं, साक्षात यमराज मला घेऊन जायला आलेले दिसत होते. अदळत आपटत गाडी खाली पडत असताना भीतीने माझ्या डोळ्या पुढे पुन्हा अंधारी आली आणि मी बेशुद्ध पडलो.

जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी बेड वर होतो. मला वाटले आपण हॉस्पिटल मध्ये बेड वर आहे. म्हणून मी उठून आजूबाजूला पाहिले. तर मी माझ्या घरी बेड वर होतो आणि मला कुठेही काहीही जखम झाली नव्हती. जे काही घडले ते रात्री झोपेत मला पडलेले एक वाईट स्वप्न होते. पण माझ्या छातीची वाढलेली धडधड मला जाणवत होती. मी अंथरुणावरूनच नमस्कार करून देवाचे आभार मानले कि, हि सगळी हकीकत नव्हती, एक स्वप्न होते. मी उठलो, पानी प्यायलो आणि धडधडत्या छातीने पुन्हा झोपी गेलो. 

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

पिंपळपार

भीमा... गावातला एक रांगडा गाडी. वय वर्षे ३२. सकाळ-संध्याकाळ तालमीत जाऊन आणि दिवस रात्र शेतात राबून बनलेली पिळदार शरीरयष्टी, भरदार मिशा आणि अस्सल गावरान बाज असलेलं आकर्षक व्यक्तिमत्व. गावात तो पैलवान म्हणूनच प्रसिद्ध होता. तसा तो कुस्ती वैगेरे करत नव्हता, पण तालमीतली कसरत, घरचा खुराक आणि घरच्या म्हैशींचे दूध याच्यामुळे पण त्याची शरीरयष्टी कुस्ती करणाऱ्या पैलवानांसारखी होती. 

रामा, शिवा, बाळ्या, बबन्या आणि जितू हे सगळे भीमाच्याच वयाचे त्याचे मित्र. सगळेच अंगापिंडाने सुदृढ होते. १०वी -१२वी झालेल्या या सगळ्या लोकांचं जगण्याचं मुख्य साधन शेती हेच होत. आप-आपल्या वाट्याला आलेल्या वडिलोपार्जित जमिनी कसून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत होते. आर्थिक परिस्थिती सगळ्यांची बऱ्यापैकी चांगली होती.

दिवसभर काबाडकष्ट मारून संध्याकाळी थोडासा वेळ मिळत होता तेव्हा ते कट्ट्यावर जमून गप्पा मारायचे. त्यांच्या या गप्पांमध्ये गाव पातळी, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश-विदेशातील राजकारण, गावात कुणाचं काय चाललं आहे, भूत-खेतं, वातावरण, पाऊस, वर्तमान परिस्थिती  यांच्या सारखे काहीही विषय असायचे. एकदा असंच यांच्या गप्पा चालू असताना भूत असत कि नसतं असा विषय चालू झाला. प्रत्येक जण आपला आपला भूता बद्दलचा अनुभव सांगू लागला.

रामाने सांगितलं कि कसे जमिनीच्या कागदपत्रांच्या कामांसाठी तो तालुक्याच्या ठिकाणी गेला होतो. काम होता होता खूप वेळ झाला होता. रात्री माघारी येताना तालुक्यच्या ठिकानाहून थोडं पुढे आल्यानंतर एका आडवळनाला एका पांढरी साडी नेसलेल्या बाईने त्याला लिफ्ट मागण्यासाठी हात केला. तो थांबला नाही. पण पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिले तर ती बाई त्या गयब झाली, ती बाई त्या ठिकाणी नव्हती.

बाळ्याने सांगितलं कि, एके दिवशी रात्रपाळीला त्याच्या ऊसाच्या शेताला पाणी पाजून माघारी येत असताना गावाच्या वेशीच्या बाहेरच्या पिंपळावरून त्याला कुणी तरी मदतीसाठी हाक मारत होत. पण तो तिकडे न पाहता, सरळ लगबगीने गावाच्या वेशीच्या दिशेने आला आणि वेशीत प्रवेश केल्या नंतर त्याने सुटकेचा निश्वास टाकला. गावाबाहेरचा तो पिंपळपार भुतबाधित होता असं गावातल्या लोकांचं म्हणणं होतं.

बबन्याने नदीकाठच्या रस्त्याला भेटणाऱ्या म्हाताऱ्या  बाबांचा आत्मा जो मानगुटीवर बसतो आणि तंबाखू आणि चुना मागतो त्याचा प्रसंग सांगितला, आणि असं काही झालं तर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून न बघता चालत राहायचं आणि त्यांनी जर तंबाखू आणि चुन्याची पुडी मागितली तर द्यायची नाही हेही सांगायला तो विसरला नाही.

शिवाने त्याच्या घराला लागून असलेल्या पडकं घर कसं  शापित आहे. त्या घराच्या ठिकाणी कसं दार-रोज रात्री लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. तिथे राहात असलेल्या लोकांची शापामुळे कशी वाताहत झाली. आणि आता ती जागा कुणीच विकत घेत नाही. याचे वर्णन केले.

जितूने त्याच्या सासरवाडीतल्या एका पडक्या वाड्यात वास्तव्यास असलेला एका म्हाताऱ्या बाईचा अतृप्त आत्मा कसा अमावस्या आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री  गावातल्या घरांचे दरवाजे ठोठावतो आणि पाणी मागते. पण गावातल्या सगळ्या लोकांना हे माहिती असल्यामुळे कुणी दरवाजा उघडत नाही. या गोष्टीचे रसभरीत वर्णन केले.

भीमाचा मात्र भूत-खेतांवर विश्वास नव्हता. सगळ्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी त्याला निव्वळ ऐकीव गोष्टी आणि अफवा वाटत होत्या. सगळ्यांच्या गोष्टी ऐकून तो हसत होता. ते पाहून बाकीच्या लोकांनी मग त्याच्या बरोबर एक पैज लावली. गावाबाहेर जो पिंपळपार होता. तो अश्या भूत-खेतांच्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता. लोकांचं म्हणणं असं असं होत कि त्या पिंपळावर एक हडळ राहात होती. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री तिकडे कुणी गेलं तर त्यांना ती हडळ हाका मारून स्वतःकडे बोलवत होती आणि त्यांना भुतबाधित करत होती. दिवसा तिकडून लोक येत-जात होती, पण रात्रीच्या वेळी मात्र लोक त्या बाजूला जायचं टाळत असत.

तर पैज अशी होती कि, गावाबाहेरच जो पिंपळपार आहे, येत्या अमावस्येच्या रात्री भीमाने तिकडे जाऊन न घाबरता एक लाकडी खुट्टा रोवून यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाकीचे लोक जाऊन भीमाने खुट्टा रोवला आहे कि नाही याची शहानिशा करून येतील. जर भीमाने न घाबरता तो खुट्टा रोवला तर बाकीचे लोक त्याला एक-एक करून प्रत्येक आठवड्याला मांसाहारी जेवणाची मेजवानी देतील. जर भीमाने खुट्टा नाही रोवला किंवा भूत असतं हे त्याने मान्य केलं तर त्याला बाकीच्या लोकांना मांसाहारी जेवणाची मेजवानी द्यायला लागेल.

२ दिवसांनी अमावास्येचा दिवस उगवला. दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी सगळे मित्र कट्ट्यावर जमले. कट्ट्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर पैजेचा विषय निघाला. सगळ्यांनी जेवण वैगेरे यावरून पुन्हा रात्री ११ वाजता कट्ट्यावर भेटायचे असं ठरलं. नंतर सगळे आप-आपल्या घरी गेले. जेवण वैगेरे आवरून रात्री ११ वाजता सगळे पुन्हा कट्ट्यावर जमले. भीमाने येताना आपल्या सोबत एक लाकडी खुट्टा आणि हातोडा आणला होता. थंडीचे दिवस असल्याने अंगावर शाल गुंडाळली होती.

गावाच्या वेशीपर्यंत सगळे त्याला सोडायला गेले. आणि तिथून पुढे त्याला एकट्याला वाजायला लागणार होते. भीमाला तिथे सोडून सगळे लोक आप-आपल्या घरी निघून गेले. तिथून पुढे त्याला अजून अंदाजे १ किलोमीटर जायचे होते. भीमा पुढे चालू लागला. वातावरणात एक भयाण शांतता होती. त्याच्या चालण्याने होणार आवाज आणि आणि त्याच्या होणाऱ्या श्वासोच्छवासाचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. मधूनचं कुठे तरी रडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज त्या भयाण शांततेला चिरत होता. गावाच्या बाहेर आल्यानंतरच्या गार वाऱ्यामुळे त्याला जास्तचं थंडी जाणावी लागली. त्याने दोन्ही हात अंगावर जी शाल घेतली होती तिच्या आत घेतले. एका हातात खुट्टा, एका हातात हातोडा, पाठीवर घेतलेली शाल, दोन्ही खांद्यावरून शालेची दोन्ही टोके छातीजवळ दोन्ही हातात घट्ट पकडली होती.

अशा भयाण आणि वीरान शांततेत, एवढ्या रात्री एकटं जाण्याचा प्रसंग त्याच्या वर याच्या आधी कधीच आलेला नव्हता. जसं-जसं तो गावापासून दूर जाऊ लागला तसं-तसं अंधार जास्तच गाढ होऊ लागला. अपुऱ्या चांदण्यांच्या प्रकाशात अंदाजानेच तो पिंपळाच्या दिशेने चालत होता. आता गावापासून तो बराच दूर आला होता. त्याच्या हृदयाची धड-धड आता वाढू लागली होती. त्या भयाण शांततेची आणि विरानतेची एक प्रकारची त्याला भीती वाटू लागली. मधूनच येणारे चित्र विचित्र आवाज आणि कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज त्याची भीती अजून वाढवत होता. अंगात असलेलं सगळं बाळ एकवटून, स्वतःच्या मनाला धीर देऊन तो पुढे चालत होता.

थोडा वेळ चालल्या नंतर तो पिंपळाजवळ पोहोचला. सुटलेल्या गार वाऱ्यामुळे होणारी पिंपळाच्या पानांची सळ-सळ त्याठिकाणी भीतीच एक वातावरण तयार करत होती. पिंपळाच्या जवळ गेल्या नंतर त्याला वातावरणात एक वेगळ्या प्रकारचा थंडावा जाणवला, एक वेगळ्या प्रकारचा सुगंध जाणवला. इतक्यात पिंपळाच्या झाडामध्ये बसलेली टिटवी आजूबाजूच्या हालचालींमुळे टिव-टिव करत उडून गेली. टिटवीच्या टिवटिवाने वातावरण अजूनच भयानक बनविले. एवढ्या थंडगार वातावरणात सुध्द्धा भीमाला आता घाम फुटायला लागला. घाबरत घाबरतच तो खुट्टा रोवण्यासाठी पिंपळाच्या बुंद्यापाशी खाली बसला. अंगात जेवढं काही त्राण शिल्लक असेल तेवढ्याने तो खुट्टा रोवू लागला. २-५ मिनिटात तो खुट्टा रोवून झाला.

खुट्टा रोवून झाल्या नंतर तो उठू लागला. पण उठताना त्याला असं जाणवलं कि आपली शाल कोण तरी पकडून कुणी तरी त्याला मागे ओढत आहे. त्याने मागे वळून पाहिले पण अंधारात त्याला नीटस नाही दिसलं पण एक विचित्र अशी आक्राळ विक्राळ आकृती त्याच्या मागे उभी होती. अंधारात त्याला काही तरी चमकताना दिसलं, बहुधा त्या आकृतीचे ते डोळे होते. आता मात्र भीमाला दरदरून घाम फुटला होता. आता आपली काही खैर नाही हे त्याला जाणवले. तसेच तो पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण मागून ती आकृती शाल पकडून त्याला मागे ओढत होती.

भीमाने आपली शाल तिथेच टाकून जिवाच्या आकांताने धूम ठोकली. अंधारातून मिळेल त्या वाटेने, खाचा-खळग्यातून भीमा धावू लागला. काट्या-कुट्याचा कशाचाच विचार न करता धावल्यामुळे त्याचे पाय रक्तबंबाळ झाले होते. भीमा जिवाच्या आकांताने एवढ्या जोरात धावत होता कि, जिथे त्याला जाताना ३०-४० मिनिटे लागली  होती, तिथे तो फक्त १० मिनिटात त्याच्या घरी पोहोचला. घरी येऊन तो तिथेच कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याच्या बायकोने आणि मुलांनी त्याला पलंगावर झोपवले. सकाळ होताच डॉक्टर बोलावून आणले. भीमाला खूपच ताप आला होता. डॉक्टरांनी भीमाला तपासून त्याला गोळ्या आणि औषधे दिली.

इकडे बाकीचे सगळे मित्र सकाळी उठून भीमाने खुट्टा रोवला कि नाही हे पाहायला पिंपळापाशी पोहोचले. तर तिथे नजारा काही वेगळाच होता. झालेलं असं कि भीतीच्या आणि गडबडीच्या भरात भीमा बसून तो खुट्टा रोवताना आपल्या अंगावर घेतलेली जी शाल होती, त्याच्या मध्येच रोवला होता, त्यामुळे उठताना त्याला कुणी तरी मागे ओढत आहे असा भास झाला. अंधारामध्ये त्याला ते समजलंच नव्हतं. पिंपळाच्या आक्राळ विक्राळ आणि विचित्र खोडाच्या आकाराला तो विचित्र आकृती समजला होता आणि तिथे उडणाऱ्या काजव्यांना आकृतीचे डोळे.

सगळं विसरून भीमाला पूर्णपणे बरा होण्यासाठी ८-१० दिवस लागले. त्याच्या मित्रांनी मात्र खरं काय झाले आहे ते भीमाला कधीच सांगितलं नाही, भीमाकडून त्यांनी भूत असत हे मान्य करवून घेतलं आणि बरं झाल्यानंतर भीमाकडून मेजवानीचा ताव मारला.

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

यादें

खिलखिलाती हुयी तेरी हंसी
आज भी मेरे कानो में गूंजती है
जिन्दगी के हसीन पलों को
फिर से रूबरू कराती है

छनछनाती तेरे पायल की छनकार
आज भी मेरे दिल में छनकती है
दिल की जो मेरी है धड़कने
उसी से तो चलती है


आंखो  की वो हसीन चमक
आज भी मेरे आंखो में जिन्दा है
चमक तो उस चांद की भी है 
पर फीकी नजर आती है

स्वर्ग से भी हसीन  ये यादें
जिंदगी का सहारा बनती है
साथ तुम हो या ना हो
पास होने का एहसास कराती है 

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

ती

निकिता आणि गौरव शहराच्या एका नामांकित अश्या IT कंपनीमध्ये सेल्स आणि मार्केटिंग विभागात कार्यरत आहेत. निकिता २८ वर्षे वयाची एक सुंदर तरुणी आहे. आपल्या हुशारीने कमी वयातच टीम लीडर बनून, सध्या ती एक पूर्ण टीम सांभाळण्याचे काम करत आहे. एका छोट्याश्या खेड्यातून पुणे शहरात येऊन, जॉब करून, तिने स्वतःच घर घेतलं होत. सध्या तरी ती एकटीच राहात होती, तीच लग्न झालेलं नव्हतं पण वरसंशोधन चालू होत. गौरव तिच्याच टीम मधला एक अत्यंत हुशार सदस्य आहे. निकिता आणि तिची टीम गौरव च्या कामावर खूपच खूश आहेत. गौरव २६ वर्षे वयाचा एक सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेला तरुण आहे. गौरव मूळचा पुण्याचाच आहे, आणि आपल्या आई-वडिलांबरोबर राहतो. गौरवपेक्षा निकिता २ वर्षांनी मोठी असूनही गौरवला ती आवडायची. प्रेम असं नाही पण आवडायची. निकिता गौरवकडे ऑफिस मधला एक सहकारी याच दृष्टीने पाहात होती. पण कधी कधी तिला गौरवच तिच्या प्रति असणारे आकर्षण समजून यायचं, ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. अनिकेत हा त्यांच्या टीम मधला आणखी एक सहकारी होता. गौरव आणि अनिकेत एकाच वयाचे असल्यामुळे खूप घट्ट मैत्री होती दोघांची.

त्यांचं ऑफिस शहरापासून थोडस बाहेरच्या बाजूला होत. आडबाजूला म्हणूयात हवं तर आपण. शहर सोडून ५-६ किलोमीटर सुमसान रस्ता होता आणि मग त्यांचं ऑफिस होत. दिवस त्या रस्त्याला माणसांची लगबग असायची पण रात्रीच्या वेळी रस्ता पूर्णपणे सुमसान व्हायचा. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या ऑफिस मध्ये संध्याकाळी ७ वाजल्या नंतर कुणाही महिला कर्मचाऱ्यांना थांबायची परवानगी नसे. 

अनिकेत, निकिता आणि गौरव शहरामध्ये एकाच भागात राहात होते. एकमेकांच्या जवळ नाही पण एकाच भागात राहात होते. म्हणजे ऑफिस मधून घरी जायचं असेल तर पहिले अनिकेत च घर यायचं, नंतर निकिता च घर होत आणि तिथून पुढे गेलं कि गेलं कि गौरवच घर होत. कधी कधी निकिताची कार खराब असेल किंवा सर्विसिंगला दिली असेल तर गौरव आणि ती गौरवच्या कार मधून एकत्र ऑफिसला यायचे आणि जायचे. अनिकेत त्याच्या बाईक वरून ऑफिस ला येत-जात होता. 

असाच जुलै महिना संपत आला होता. सगळीकडे पावसाचे वातावरण होते. महिना अखेर असल्याने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी सगळ्यांची गडबड चालू होती. त्या दिवशी पण दिवसभर खूप काम होते. संध्याकाळी ६.३० झाले होते. अजूनही खूप काम बाकी होते. बाहेर पाऊसही खूप जोराचा पडत होता. पावसाचं वातावरण पाहून बाकीचे लोक आप-आपले काम आवरून निघून गेलेले. आता त्यांच्या टीम मध्ये फक्त निकिता आणि गैरव राहिले होते.  पण निकिताला ७ च्या आधी जायला लागणार होत. त्यामुळे बाकीच राहिलेलं काम गौरवला समजावून सांगून निकिता ऑफिस मधून निघाली.

असलेल्या कामाचा व्याप पाहता गौरवला अजून २-३ तास तरी लागणार होते. निकिता गेल्या नंतर गौरव ऑफिस मधल्या कॉफी मशीन मधून कॉफी घेऊन आला आणि कॉफी पीत पीत आपलं राहिलेलं काम करू लागला. थोड्या वेळाने गौरवने ऑफिस मध्ये एक नजर फिरवली, तर पूर्ण ऑफिस मोकळं मोकळं झालेलं दिसलं त्याला. सेक्युरिटी गार्ड सोडून बहुधा तो एकटाच होता ऑफिस मध्ये. राहिलेल सगळं काम पूर्ण होईपर्यंत गौरवला आणखी २-२.५ तास लागला. त्याने निघताना घड्याळात पाहिले तर ९.३० वाजले होते. गौरवने आपली कार स्टार्ट केली आणि तो ऑफिस मधून घरी जायला निघाला. खूप जोराचा पाऊस अखंड चालू होता.

ऑफिस मधून बाहेर पडल्या नंतर गौरव त्या सुमसान रस्त्याला आला. ३-४ किलोमीटर गेल्या नंतर त्याला कुणी तरी एक तरुणी लिफ्ट मागत आहे असं दिसलं. त्याने त्याची गाडीचा वेग कमी केला. एवढ्या पावसात सुमसान रस्त्याला कुणी तरुणी एकटी मदत मागत आहे म्हणून त्याने गाडी त्या तरुणी जवळ थांबवली. गाडीच्या उजेडावरून तरी ती तरुणी निकिता वाटत होती. त्याने गाडीची काच खाली करून पाहिले तर खरचं ती तरुणी निकिता होती. निकिता पूर्ण भिजली होती पावसात. त्याने तिला गाडीत घेतले.
गौरव : अश्या इथे का उभ्या आहात आणि तुमची कार कुठे आहे?
निकिता : अरे माझी कार खराब झाली आहे, बंद पडली आहे. किती तरी वेळ झाली मी इथे कुणाची तरी मदतीची वाट पाहात उभी आहे. 
गौरव : तुम्ही निघून २.५ तास झाला, एवढा वेळ कशाला वाट पाहात उभा राहायच, मला कॉल करायचा ना मग. 
निकिता : अरे दिवसभर कामाच्या व्यापात मला फोनची बॅटरी चार्ज करायचं विसरूनच गेले मी, माझ्या फोन ची बॅटरी पण संपली आहे. फोन स्विच ऑफ झाला आहे माझा.
गौरव : ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना?
निकिता : हो, ठीक आहे. 

गौरवने कार स्टार्ट केली आणि पुढचा प्रवास चालू झाला. पुढे निकिताच्या घरापर्यंतचा ६-७ किलोमीटर चा प्रवास होता. निकिता ला तिकडे सोडून गौरवला पुढे त्याच्या घरी जायचं होतं. निकिता पूर्ण भिजलेली होती, तिच्या केसांमधून निघणारे पाणी तिच्या चेहऱ्यावर येत होते. अश्या अवतारात गौरवला निकिता जास्तच आकर्षक भासू लागली. एव्हाना निकिताला पण ते जाणावू लागलं होत. निकिताला गौरवची मस्करी करण्याचा मुड झाला. 

निकिता : माझ्याकडे पाहून काय गाडी चालवत आहेत, पुढे पाहून चालावं नाही तर एक्सीडेंट करशील कुठे तरी. कधी सुंदर तरुणी पहिली नाहीस काय?
गौरव : सुंदर तरुणी तर खूप पाहिल्या आहेत, पण तुमच्या सारखी पावसात भिजलेली सुंदर तरुणी नाही पाहिली कधी. 

असच काही वेळ एकमेकांशी फ्लर्ट करत दोघांना निकिताच घर कधी आलं ते समजलंच नाही. पाऊस अखंड चालूच होता. निकिताने उतरत असताना गौरवला कॉफी पिण्यासाठी घरी येण्याची विनंती केली. गौरवने सुरुवातीला टाळाटाळ केली पण मग निकिताने जास्तच आग्रह केल्या नंतर तो तयार झाला. दोघे घरी आले. गौरवला पाणी देऊन निकिता कपडे चेंज करायला गेली. पाणी पिऊन निखिल आपला मोबाइल चेक करण्यात व्यस्त झाला. थोड्या वेळात निकिता ट्रे मध्ये २ कप कॉफी घेऊन आली. ती येताच गौरव तिच्या कडे पाहतच राहिला. तिने कपडे बदलून नाईटी घातली होती. चंदेरी रंगाच्या नाईटी मध्ये गौरवला निकिता जणू अप्सराच भासत होती. गौरव तिच्याकडे पाहातच राहिला. निकिताने गौरवला एक कप देऊन दुसरा कप स्वतः घेऊन कॉफी पिऊ लागली. गौरवचे तिच्याकडे असे पाहणे, निकिताला पण आकर्षित करू लागेल. तिच्या मनातहि आता तारुण्य सुलभ भावना जन्म घेऊ लागल्या. दोघे काही वेळ एकही शब्द न बोलता कॉफी पितं होते. दोघांनाही एकमेकाच्या भावना समजत होत्या. कॉफी पिऊन झाल्यानंतर कॉफीचे कप आत नेऊन ठेवण्यासाठी म्हणून निकिता उठली. पण उठताना समोरच्या छोट्या टेबलला पाय लागून तिचा तोल गेला. ती खाली पडणारच होती इतक्यात गौरवने तत्परता दाखवत तिला सांभाळलं. पण या सगळ्या गडबडीत परिस्थिती अशी झाली होती कि गौरवचा उजवा हात निकिताच्या कमरेत होता आणि गौरवाचा उजवा हात आपण पडू नये म्हणून निकिताने घट्ट पकडला होता. सुरुवातीला तिला काही समजलं नाही. पण थोड्या वेळाने आपली अवस्था समजल्यानंतर तिला लाजून लाजल्यासारखे झाले. तारुण्य सुलभ भावनां पासून सुरु झालेला हा त्या रात्रीचा खेळ मग पुढे प्रणयसाधाने पर्यंत रंगला. 

गौरव जेव्हा घरी जायला निघाला तेव्हा रात्रीचे १ वाजले होते. थोड्याच वेळात गौरव आपल्या घरी पोहोचला. झाल्या प्रकारामुळे त्याला थोडा थकवा जाणवत होता. अंथरुणावर पडल्या नंतर त्याला गाढ झोप कधी लागली ते त्याचे त्यालाच कळले नाही. सकाळी ८ वाजता त्याला जाग आली तेव्हा त्याचा फोन वाजत होता. त्याने फोन घेऊन पाहिले तर त्याला अनिकेतने कॉल केला होता. कॉल रिसिव्ह करून गौरव बोलू लागला.

गौरव : हॅलो
अनिकेत : हॅलो गौरव, अरे कुठे आहेस?

सकाळी सकाळी गुड मॉर्निंग वैगेरे विश न करता डायरेक्ट कुठे आहेस असं कस विचारात आहे असा विचार गौरवच्या मनात आला. अनिकेतच्या आवाजात पण थोडासा घाबरलेपणा वाटत होता त्याला.

गौरव : अरे एवढ्या सकाळी कुठे असणार. घरी आहे. का रे? काय झालं?
अनिकेत : लवकरात लवकर आवरून माझ्या घरी ये. आपल्याला ऑफिस ला जायचं आहे अर्जेंट.
गौरव : अरे पण असं इतकं काय अर्जेंट आहे? काय झालं ते तरी सांगशील का मला?
अनिकेत : तू माझ्या घरी ये तुला सांगतो मी काय ते. आणि हो लवकरात लवकर ये.

असं बोलून अनिकेतने फोन कट केला. झोपेतून उठवला म्हणून गौरवला अनिकेतचा थोडासा राग च आला होता. त्यात काय झालं आहे हे सांगितलं नसल्यामुळे त्या रागात आणखी भर च पडली. तासाभरात सगळं आवरून गौरव अनिकेतच्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्या नंतर गौरवने रागातच अनिकेत ला विचारले कि काय झालं आहे? आणखी एवढ्या अर्जेंट मध्ये का बोलावलंस मला? त्याच्या नंतर अनिकेत ने जे सांगितलं ते ऐकून गौरव ला धक्काच बसला, त्याचे डोकं भणभणू लागलं.

अनिकेत बोलत होता - "काल रात्री जोरदार पाऊस चालू होता. निकिता ऑफिस मधून निघाली. पण सुमसान रस्त्याने जात असताना गाडीचा ताबा सुटून तिच्या गाडीला खूप मोठा एक्सीडेंट झाला आहे. अपघात एवढा मोठा होता कि गाडी रास्ता सोडून बाजूच्या उतारावरून झाडावर जाऊन आदळली. निकिता जाग्यावरच मृत झाली. मला ऑफिस मधून कॉल आलेला कि असं असं झालं आहे म्हणून. आपल्याला तिकडे जायला लागेल."

अनिकेत बोलत होता. पण गौरवच्या पायाखालची जमीनच सरकली होती. अनिकेत काय बोलत आहे त्याच्याकडे गौरवच लक्ष च नव्हतं. गौरवला घेऊन अनिकेत घटनास्थळावर पोहोचला. तिथली अवस्था खुच वाईट होती. गाडीचा चक्काचूर झाला होता. पोलीसांनी निकिताचा मृतदेह बाहेर काढून बाजूला ठेवला होता. घटनास्थळाचा पंचनामा चालू होता. ती जागा पाहून गौरवला कालचा प्रसंग आठवला. त्याच्या मनात आलं "अरे हि तर तीच जागा आहे जिथून आपण काल निकिताला लिफ्ट दिली होती". गौरवला ते आठवल्या नंतर पुढचं सगळं काही अंधुक अंधुक दिसायला लागला, आणि थोड्याच वेळात भोवळ येऊन तो धाड्कन जमिनीवर कोसळला.

२ दिवसानंतर गौरव शुद्धीवर आला तेव्हा तो दवाखान्यात होता. भोवळ आल्यानंतर त्याला अनिकेतने दवाखान्यात दाखल केलं होतं. त्याचे आई - बाबा आणि अनिकेत त्याच्या जवळ होते. गौरव शुद्धीवर आल्या नंतर अनिकेतने त्याला थोडासा धीर दिला. अनिकेतला वाटत होत कि आपली एक खूप जवळची सहकारी गेली म्हणून गौरवला धक्का बसला आहे. त्याच्याशी थोड्या वेळ बोलून अनिकेत ऑफिसला निघून गेला. थोड्या वेळाने डॉक्टर येऊन गौरवला तपासून गेले. त्यांनी पेशंटला आराम मिळावा म्हणून गौरवच्या आई-बाबांना बाहेर जायला सांगितले. सगळं चेक करून डॉक्टर निघून गेले.

गौरवच्या डोक्यात मात्र एकच विचार चालू होता ज्याचे उत्तर त्याला तेव्हाही मिळाले नाही आणि नंतर आयुष्यात पुढेही कधी मिळाले नाही - ती रात्र आपण जिच्या सोबत घालवली, ती नक्की कोण होती? एक स्वप्न, एक भास कि आणखी काही ???