रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

प्रवास - एका थरारक वाळणावरचा

ऑफिस मधील सहकारी - ज्यांच्या सोबत आपण आठवड्यातले ५-६ दिवस दररोज ९-१० तास वेळ घालवतो ते आपले ऑफिस मधील सहकारी हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात. पण व्यावसायिक नात्यासोबतचं जर त्यांच्या सोबत आपलं मित्रत्वाचं नातं असेल तर काम करण्याचा आणि जगण्याचा आनंद द्विगुणित होऊन जातो. छोट्या-मोठ्या ट्रिप्स, ट्रेकिंग-हायकिंग, मूवी अश्या गोष्टी सोबत हे नातं अधिकचं घट्ट होत जातं, आणि ऑफिसमध्ये आपल्याला असे चांगले सहकारी-मित्र मिळणे हि थोडी भाग्याचीच गोष्ट असते.

आमच्या ऑफिस मध्ये निशांत, राघव, वरूण, विनोद, आयुश आणि मी अशी आमची ६ जणांची टीम. ऑफिस मधले बाकीचे सहकारी आमच्या या टीमला  "टोळी" म्हणायचे. कारणही तसाच होतं, जशी वात्रट लोकांची एक टोळी असते, तशीच आम्ही ६ जण ऑफिस मध्ये कामाबरोबरच दंगा-मस्ती करण्यात नेहमी पुढे असायचो. त्यामुळे बाकीचे सहकारी आमच्या या टीमला "टोळी" म्हणायचे.

आम्हीहि छोट्या ट्रिप्स, ट्रेकिंग-हायकिंग, मूवी असं सगळं एकत्र प्लान करायचो. असाच आमचा एक प्लान बनलेला "गोवा ट्रिप". तर हि आमची एक अशी ट्रिप होती जी खूप दिवसापासून पुढे-पुढे जात होती. ३-४ वेळा सगळी तयारी होऊन आमचा प्लान आयत्या वेळी रद्द झालेला. कधी निशांतच्या बहिणीच्या लग्न होत, तर कधी वरूण आयत्या वेळी खूप आजारी पडला होता. तर सांगायचं मुद्दा असा आहे कि आमची हि "गोवा ट्रिप" काही केल्या पूर्णत्वास येत नव्हती. मध्येच कधी ऑफिसला सलग ३-४ दिवस सुट्टी मिळाली कि विषय निघायचा "चलो गोवा चालते है", पण आयत्या वेळी काही तरी कारण आडवं येऊन आमचा तो प्लान रद्द व्हायचा. कधी-कधी चर्चा करत असताना आम्हीच आमच्या या परिस्थितीबाबत हसायचो आणि म्हणायचो, "आपल्या गोवा ट्रिप ला इतकी कशी काय विघ्न येत आहेत, श्रावणात सत्यनारायणाची पूजा घालून, देवाला साकडं घालायला लागतय  वाटतं गोवा ट्रिप साठी."

तर अशीच हि ट्रिप पुढे-पुढे जात २ वर्षे निघून गेली. आम्ही सगळे लोक अमेरिकेच्या क्लायंट साठी काम करत होतो, त्यामुळे आमचा ५ दिवसाचा आठवडा असायचा, शनिवार-रविवार सुट्टी असायची. तसेच अमेरिकेत फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी "प्रेसिडेंट डे" ची सुट्टी असते म्हणून मग आम्हाला पण सुट्टी होती. त्यामुळे ऑफिसला शनिवार-रविवार-सोमवार अशी ३ दिवस सुट्टी होती. पुन्हा एकदा "चलो गोवा चालते है" हा विषय निघाला. सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा करून, गोवा ला जायचा प्लान पक्का केला. शुक्रवारी सगळ्यांनी सुट्टी घेऊन, शुक्रवार-शनिवार-रविवार-सोमवार असा ४ दिवसांचा गोवा प्लान ठरला. गुरुवारी रात्री पुण्याहून निघायचं रात्रीत गाडी चालवत सकाळ पर्यंत गोवा ला पोचायचं तिकडे मग शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी दुपारपर्यंत गोवा मध्ये फिरायचं-मजा करायची सोमवारी दुपारी गोवाहून निघायचं म्हणजे सोमवारी रात्री पर्यंत पुणे मध्ये माघारी पोहोचू. रात्री आराम करून मंगळवारी ऑफिसला जाता येईल असा सगळा आमचा प्लान होता. आम्हाला जवळ जवळ सगळ्यांनाच कार चालवता येत होती त्यामुळे जाताना आणि येताना थोडं थोडं सगळ्यांनी गाडी ड्राइव्ह करायचं असं ठरलं होत. झूमकार(Zoomcar) मधून आम्ही इनोव्हा गाडी बुक केली. तब्बल २ वर्षांनी आमचा गोवा ला जायचा प्लान पूर्णत्वास येत होता.

गोवा ला जायचा दिवस उजाडला. संध्याकाळी ८ वाजता निशांत गाडी घेऊन आला, सगळ्यांना घेऊ पर्यंत पुन्हा पुढचा एक-दीड तास गेला. रात्री १० च्या सुमारास आम्ही पुण्यातून बाहेर पुणे-बेंगलोर महामार्गावर होतो. पहिले निशांत, नंतर राघव आणि मग आयुश असे ड्राइव्ह करत आम्ही कोल्हापूरच्या पुढे कागल नावाच्या गावापर्यंत पोचलो. ज्यावेळी एक जण ड्राईव्ह करत असेल तर बाकीचे सगळे झोपून जात असत, जेणेकरून गाडी चालवताना कुणालाहि झोप येऊ नये. कागलला एका टपरीवजा होटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलो, तेव्हा सगळे जागे झाले, अर्धवट झोपेतून उठून, कसं तरी तोंड खळबळून, सगळ्यांनी चहा घेतला. राघव, निशांत आणि वरुण यांनी चहा बरोबर सिगारेट शिलगावली. एव्हाना रात्रीचे २ वाजले होते.  १०-१५ मिनिटे त्या ठिकाणी थांबून आम्ही पुढच्या वाटेल लागलो. आता गाडी मी ड्राईव्ह करत होतो, बाकीचे सगळे पुन्हा झोपून गेले.

तिथून पुढे कर्नाटक बॉर्डर पार करून निपाणी मधून आम्ही आंबोली घाटाकडे जाऊ लागलो. साधारण पुढच्या एका तासात आम्ही आंबोली घाटात होतो. रात्रीचे ३ वाजले होते. पूर्ण रस्ता निर्मनुष्य होता, मध्येच एखादी-दुसरी गाडी येता-जाताना दिसत होती.

आंबोली घाटाविषयी मी चांगल्या-वाईट अश्या खूप गोष्टी ऐकून होतो. १)आंबोली धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय. २)तसेच मध्यंतरी पोलीस कस्टडी मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्या नंतर आंबोली घाटात मध्ये नेऊन पुरावे नष्ट करण्याचे एक प्रकरण खूप गाजले होते. ३)तसेच आंबोली घाटामध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांची बातमी अधून मधून धडकतच असते.

आंबोली घाटामध्ये खूप सारे अपघात होतात, आणि अश्या आकस्मित निधनाने मृत्यू पावलेल्या लोकांचे अतृप्त आत्मे तिथेच वास्तव्यास आसतात, वारंवार तिथे होणाऱ्या अपघातांना हे अतृप्त आत्मेच कारणीभूत आहेत, अश्या गोष्टी मला ऐकून माहिती होत्या.

जिथे आंबोली घाट चालू झाला तिथे गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात मला एक पाटी दिसली "पुढे घाट चालू होत आहे, नागमोडी वळणे, वाहने सावकाश चालवा". ती पाटी पाहिल्या नंतर मागच्या ऐकलेल्या सगळया गोष्टी माझ्या मनात तरळून गेल्या, माझ्या मनात एक प्रकारची धाक-धुकं चालू झाली. एक तर रात्रीच्या वेळी घाटात गाडी चालवण्याचे दडपण, त्यामध्ये पूर्ण रास्ता निर्मनुष्य दिसत होता, आणि त्याउपर म्हणजे त्या ऐकीव गोष्टींचे दडपण. गाडीमध्ये असणाऱ्या लोकांपैकी कुणी जाग आहे का हे पाहण्याचा मी प्रयत्न केला, ज्यामुळे माझ्या मनात निर्माण झालेली भीती थोडीशी कमी होईल. ड्राइवर सीटला लागूनच असलेल्या सीट वर राघव बसला होता. मी त्याच्या कडे एक कटाक्ष टाकला तर तो निद्रिस्त झालेला होता. मागे बसलेल्या लोकांचे तर घोरण्याचे आवाज मला येत होते, त्यामुळे त्यांच्या पैकी कुणी जाग असण्याचा संबंधच नव्हता.

हताश होऊन मी पुढे पाहून गाडी चालवू लागलो. जसं-जसं पुढे जाऊ लागलो तसं-तसं जंगल एकदम गर्द होऊ लागले. एक भयाण शांतता होती सगळीकडे. आमच्या गाडीचा आवाज आणि रात्रीच्या वेळी किरकिरणाऱ्या किरकिर किड्यांचा आवाज त्या गर्द जंगलराईमधल्या त्या भयाण शांततेला भेदत होता. त्या भयाण शांततेबरोबरच माझ्या मनातला अदृश्य शक्तींचा विचार अजूनच गडद होत चालला होता. असं म्हणतात ना कि, एखाद्या गोष्टीचा खूप विचार केला तर ती गोष्ट आपल्याला खारी वाटू लागते, माझ्याही मानाचं तसेच काहीतरी झालं होत.

असेच सगळे विचार आणि मनाची चलबिचल चालू असताना घाटाच्या एका वळणाला मला असे वाटले कि माझ्या गाडी समोर काही ३-४ लोक उभी आहेत, पण जेव्हा गाडीच्या दिव्यांच्या उजेडात मला त्यांचे चेहरे दिसले तेव्हा भीतीने माझ्या अंगावर सर्रर्रर्रकन काटा उभा राहिला. सगळ्यांचे चेहरे एकदम विद्रुप दिसत होते. मूवी मध्ये जे झोंबी दाखवतात ना त्यांच्या सारखेच होते ते सगळे लोक. ते आमच्या गाडीच्या समोर आले आणि आता आमची गाडी त्यांना धडकणार म्हणून मी डोळे गच्चं मिटून घेतले. क्षणभरानंतर मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिथे कोणीही नव्हते. आमची गाडी कुणालाही धडकली नव्हती. हे सगळं काय होत हे जाणून घेण्यासाठी गाडीच्या आरश्यामध्ये  मागचं काही दिसत आहे का ते पाहण्याचा मी प्रयत्न केला. पण मला मागच्या बाजूला काहीही दिसलं नाही. भीतीपोटी निर्माण झालेला माझ्या मनाचा भास होता तो निव्वळ.

या सगळ्या गडबडीमध्ये माझं पुढे लक्षच नव्हतं आणि गाडी तशीच पुढे चालू होती, पुढे एक तीव्र वळण होते, मी कसं तरी गाडी कंट्रोल करून गाडी वळणाला वळविली पण तोवर समोरून एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. आता गाडी ट्रक वर आदळणार म्हणून मी गाडी थोडीशी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या गडबडीमध्ये माझा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी थेट समोर असलेल्या दरीमध्ये कोसळली. आदळत-आपटत गाडी दरीमध्ये खाली जात होती. बाकीचे सगळे लोक जे गाढ झोपेत होते, त्यांना काय होत आहे ते समजलेच नाही. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी बेशुद्ध झालो.

जेव्हा मला जाग आली तेव्हा पाहिले तर गाडी खोल दरीमध्ये कशाच्या तरी आधाराने अधांतरीच लटकत होती. आजूबाजूची परिस्थिती खूपच गंभीर होती. माझ्या पायाला खूप मार लागला होता, खूप रक्त गेले होते. बाजूच्या सीटवर बसलेला राघव अर्धवट शुद्धीत होता. त्याच्याही हाता-पायाला मार लागून रक्त गेले होते. सगळीकडे रक्ताचा सडा पसरला होता. राघवला आणि मला सीटबेल्ट लावल्यामुळे डोक्याला मार लागला नाव्हता. बाकीच्या लोकांच्या डोक्याला खूप मार लागला होता, त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीच शुद्धीत नव्हतं. मी बाहेर पाहून थोडंसं कुठे आहोत हे अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, तर गाडीच्या चालू-बंद होणाऱ्या दिव्यांवरून मला समजले कि आमची गाडी एका मध्यम आकाराच्या झाडाच्या आधाराने अधांतरी लटकत आहे. पण एवढ्या मोठ्या आघाताने ते झाड पण आता जास्त वेळ तग धरू शकणार नाही हे मला दिसत होत.

मी थोडस हालून बाहेर जायला येत आहे का याचा प्रयत्न केला, पण या सगळ्याचा पारीणाम असा झाला कि गाडीच्या होणाऱ्या हालचालींमुळे ते झाड आणखी कमकुवत होऊ लागले, त्यामुळे मी हालचाल थांबवली. तरीही थोड्याच वेळात कर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा झाड तुटण्याचा आवाज झाला आणि आमची गाडी पुन्हा त्या खोल दरीत कोसळू लागली. आता यातून आपली सुटका नाही हे मला समजलं, साक्षात यमराज मला घेऊन जायला आलेले दिसत होते. अदळत आपटत गाडी खाली पडत असताना भीतीने माझ्या डोळ्या पुढे पुन्हा अंधारी आली आणि मी बेशुद्ध पडलो.

जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी बेड वर होतो. मला वाटले आपण हॉस्पिटल मध्ये बेड वर आहे. म्हणून मी उठून आजूबाजूला पाहिले. तर मी माझ्या घरी बेड वर होतो आणि मला कुठेही काहीही जखम झाली नव्हती. जे काही घडले ते रात्री झोपेत मला पडलेले एक वाईट स्वप्न होते. पण माझ्या छातीची वाढलेली धडधड मला जाणवत होती. मी अंथरुणावरूनच नमस्कार करून देवाचे आभार मानले कि, हि सगळी हकीकत नव्हती, एक स्वप्न होते. मी उठलो, पानी प्यायलो आणि धडधडत्या छातीने पुन्हा झोपी गेलो. 

६ टिप्पण्या: