सोमवार, १३ मे, २०१९

हमसफर

दिन तो ढल जाता है
दोस्तो रात कैसे बिताऊ
जिंदगी की कश्मकश यह
किस किस को समझाऊ

तन्हा चल पडा हू
शायद राहे रास्ता बता दे
जिंदगी के सफर मे
शायद हमसफर को मिला दे

शनिवार, ११ मे, २०१९

सोबती

जीवनाचा हा कठीण प्रवास
जिच्या साथीने सुखकर व्हावा
अशी एक सोबती असावी

सुखात सोबत असेल
आणि दुःखात सामील असेल
अशी एक सोबती असावी

उगाचच आपल्याकडे हट्ट करणारी
हक्काने आपल्यावर रुसणारी
अशी एक सोबती असावी

समोर असतां तिच्याकडेच पाहावं
समोर नसता तिच्या आठवणीत रमावं
अशी एक सोबती असावी

लटके -झटके आणि नखरा करावा
त्यावर आपला जीव ओवाळून टाकावा
अशी एक सोबती असावी

जिच्या नसण्याने उदास व्हावं
असण्याने आयुष्य पूर्ण वाटावे
अशी एक सोबती असावी

नात्यांचं गणित पक्क माहिती असलेली
आणि त्याच गणिताचे फॉर्मुले शिकवणारी
अशी एक सोबती असावी

स्वतःच वेगळं अस्तित्व जपणारी
तरीही आपल्यात तिचं अस्तित्व शोधणारी
अशी एक सोबती असावी

प्रसंगी कणखर कठीण रागीट
पण तेवढंच गोड कौतुक करणारी
अशी एक सोबती असावी

जगण्याची एक वेगळीच नशा
जिच्या सोबत अनुभवता यावी
अशी एक सोबती असावी


तू शोध स्वतःला

पुन्हा नवी पाहाट आहे 
प्रत्येक अंधाऱ्या रात्री नंतर 
जगण्याचे हे गणित आहे 
प्रत्येक प्रश्नाला आहे उत्तर
तू सावर स्वतःला 

घेऊनि जगण्याची नवी आशा 
आणि जीवनाची नवी परिभाषा 
नवी  उमंग अन नवा श्वास 
स्वतःवर तू कर विश्वास 
तू शोध स्वतःला 

भूतकाळाचे तोडुनी पाश 
भविष्याची घेऊनि आस 
स्वप्न नवे अन नवा ध्यास 
नवचैतन्याचा पुन्हा उल्हास
तू समज स्वतःला 

जगण्याला तू दे आव्हान 
ऊठ पुन्हा तू हो तैयार 
कितीही अवघड असेल रस्ता
करायचा आहे तुला तो पार  
तू चेतव स्वतःला





शुक्रवार, १० मे, २०१९

मन हे माझे

पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिले 
मन हे माझे नकळत रमले 
अंतरंगीच्या तुझ्या छटांना 
मन हे माझे नकळत भुलले 

मन हे माझे कोशामधले 
सुस्त च होते जीवन माझे  
तुझे आगमन होता नकळत 
फुलपाखरू हे बागडू लागले 

तुझी चाल जशी हरिणी चाले 
बोलणे जैसे कोकीळ बोले 
तुझ्या निराळ्या अश्या अदांनी 
मन हे माझे घायाळ केले 

असतेस तू जेव्हा जवळी माझ्या 
मन प्रफुल्लित होऊन जाते 
तुझ्या प्रेमाच्या स्पर्शामधूनी 
अंतरंग हे खुलुनी येते 

तुझी स्वप्ने आणि माझी स्वप्ने 
जरी हे विश्व वेगळे असले 
दोघे मिळुनी आपण  बनवू 
एकच विश्व सोबत आपले

फक्त तू ...


सोमवार, ६ मे, २०१९

एहसास

तुम हो बेटी, तुम ही हो बहन
सदा तुम पर रहे खुदा का रहम

तुम हो प्रियतमा, तुम ही हो पत्नी
तुम जो साथ हो, तो जीतु दुनिया सारी

सृष्टी की रचयिता, तुम ही हो माता
तेरे चरणों मे अर्पन है, मेरा जीवन सारा

अटल भी तुम, अचल भी तुम, चट्टान सी खडी
हर फर्ज निभाने मे हो तुम सबसे बडी

स्नेह और ममता से भरपूर यह जीवन
जो पा सके उसका जीवन हे पावन

हे औरत तेरे कितने रूप मै देखू
हर रूप मे एक नया एहसास मै पाउ

रविवार, ५ मे, २०१९

शिवनेरी - स्वराज्य सूर्याचा उदय

परिचय

शिवनेरी ...... 
महाराष्ट्राच्या किल्ले इतिहासात शिवनेरी किल्ल्याच एक वेगळं वैशिष्ट्य आहे. शिवनेरी म्हणलं कि कोणत्याहि मराठी माणसाच्या मनात येत ते म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्मस्थान. स्वराज्याचे पहिले शासक म्हणून आपण ज्या श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना ओळखतो, त्या शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी याच शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि मग त्याच दृष्टीने पाहायला गेलं तर, मराठी स्वराज्य आणि साम्राज्याचा उदय याच किल्ल्या पासून झाला असं म्हणायला हरकत नाही.

इतिहास

किल्ल्याचा इतिहास पाहता शिवनेरी किल्ला आणि जुन्नर परिसराचे वास्तव्य इसवी सन पूर्व काळापासून आपल्याला दिसते. शक राज्यांच्या काळात हे राजधानीचे ठिकाण होते. याच परिसरातुन पुरातन व्यापारी मार्ग जात होता. नंतर सातवाहन राजांनी शकांचा नाश करून या परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. व्यापारी मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी दुर्गांची निर्मिती करण्यात आली.

सातवाहनांनंतर हा परिसर चालुक्य आणि राष्ट्रकूट राजांच्या राजवटीखाली राहिले. ११ व्य शतकाच्या सुमारास येथे यादव राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. १४ च्या शतकात किल्ला बहामनी सुलतानांच्या राजवटीखाली आला. नंतर १४ व्या शतकाच्या शेवटी निजामशाहीची स्थापना झाल्या नंतर इथली राजधानी अहमदनगरला हलवण्यात आली.

यानंतर १५ व्या शतकाच्या शेवटी किल्ला व प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. मालोजी राजे भोसले यांना आपण सगळे शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणून ओळखतो. राजमाता जिजाबाई गरोदर असताना सन १६२९ मध्ये त्यांना या किल्ल्या वर आणण्यात आले. गडावर श्रीभवानी शिवाई देवीस राजमाता जिजाबाईंनी नवस केला कि जर पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन. त्यानंतर शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी शिवाजीराजे यांचा जन्म झाला. तारीख होती १९ फेब्रुवारी १६३०. सन १६३२ मध्ये राजमाता जिजाबाईंनी गड सोडला. १६३७ साली किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. नंतर १७१६ साली शिवनेरी मराठा साम्राज्यात सामील झाला. पुढे तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

भौगोलिक माहिती

शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या या किल्ल्याच बांधकाम १७ व्या शतकातलं आहे आणि उंची समुद्र सपाटी पासून १०६७ मीटर (अंदाजे ३५०० फूट ) आहे.
दक्षिणोत्तर असणाऱ्या या किल्ल्याचा आकार त्रिकोणी किंवा काहीसा शंकराच्या पिंडीच्या आकाराचा आहे. गडाच्या सर्व बाजूना कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा हा बालेकिल्ला आहे.

कसे पोहोचाल

पुण्यापासून ९० किलोमीटर लांब जुन्नर हे तालुक्याच ठिकाण आहे . पुणे -नाशिक  महामार्गावरून जात असताना ७५ किलोमीटर गेल्या नंतर नारायणगांव लागतं . तिथून डावीकडे १७ किलोमीटर गेलं कि जुन्नर येत . जुन्नर गावाला लागूनच  ३ किलोमीटर पुढे गेलं कि शिवनेरी किल्ल्याच ठिकाण आहे . किल्ल्या पर्यंत तुम्ही रस्त्यांच्या मार्गे पोहोचू शकता. शिवनेरी किल्ल्या पर्यंतचे सगळे रस्ते छान आहेत.

सर्वात नजीकच बस स्टॅन्ड हे जुन्नर आहे.
सर्वात नजीकच रेल्वे स्थानक आणि विमानतळ हे पुणे आहे.

काय काय पाहाल

१. छत्रपती शिवाजी महाराजांच जन्मस्थान
२. राजमाता जिजाबाई आणि बाळ शिवाजी यांचा पुतळा
३. शिवाई देवीच मंदिर
४. गंगा आणि जमुना टाके
५. बदामी टाके
६. कडेलोट टोक
७. अंबरखाना
८. दरवाजे
९. उद्याने - तानाजी मालुसरे उद्यान, जिवा महाला उद्यान, राजमाता जिजाऊ उद्यान
१०. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर

किल्ल्याची सफर 

जुन्नर मध्ये आगमन करत असताना च एक छान-भव्य अशी कमान  आपले शिवरायांच्या जन्म भूमीत स्वागत करते.



कमानी मधून प्रवेश केल्या नंतर तुम्हाला जुन्नर गाव व वस्ती पाहायला मिळेल. जुन्नर मध्ये प्रवेश करता समोरच तुम्हाला शिवनेरी किल्ल्याच दर्शन होईल.



तुम्ही काही खाण्याचे पदार्थ किंवा काही गरजेच्या वस्तू खरेदी करणार असाल तर त्या तुम्हाला इथेच म्हणजे जुन्नर मध्येच करावं लागेल कारण गावाच्या बाहेर/किल्ल्याकडे जाताना तुम्हाला जास्त काही मिळणार नाही. जुन्नर मधून बाहेर पडला कि थोड्याच अंतरावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौक लागेल. चौकात तुम्हाला शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं दर्शन होईल.


गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाट आहेत.

१. साखळीची वाट
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डावीकडे किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे गेलं कि एक किलोमीटर वर रस्त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक मंदिर लागेल. मंदिर समोरून जाणारी पायवाट हि तुम्हाला थेट शिवनेरी किल्ल्याच्या कातळभिंतीपाशी नेऊन सोडते. इथून पुढे भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या मदतीने तुम्हाला गडावर पोहोचता येते. हि वाट थोडी अवघड वाट आहे.


२.दरवाजांची वाट

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डावीकडे किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने सरळ पुढे गेलं कि डाव्या बाजूला तुम्हाला एक दत्त मंदिर लागेल. तिथे  शिवनेरी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्गदर्शक फलक तुम्हाला दिसेल. हा किल्ल्याचा पायथा आहे. पायथ्या पासून पण पुढे किल्ल्याच्या मुख्य दरवाजा पर्यंत जाण्यासाठी सिमेंट-कॉंक्रिटचा  पक्का रस्ता आहे . तुम्ही कोणत्याही हलक्या किंवा जाड वाहनाने किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या पर्यंत जाऊ शकता. किल्ला चालू होण्याच्या आधी तुम्हाला काही थंड पेये , खाद्य-पदार्थ आणि टोपी वैगेरेचे काही विक्रेते तुम्हाला दिसतील. किल्ल्यावर भ्रमंती सुरु करण्याच्या आधी हे शेवटच ठिकाण आहे जिथे तुम्हाला काही खायला घ्यायचं असेल किंवा खायचं असेल तर घेऊ/खाऊ शकता.

किल्ल्या वर चढाईची सुरूवात पक्क्या पायऱ्यांपासून होते.

किल्ल्या वर जाण्यासाठी आणि वर फिरण्यासाठी खूप छान रस्त्यांची व्यवस्त्या केलेली आहे. लोकांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. 




किल्ल्याची चढाई करत असताना वेग वेगळे दरवाजे लागतात. एकूण ७ दरवाजे लागतात असं म्हणतात पण माझ्याकडे ५ च दरवाजांची माहिती आहे. जसे बहुतेक गडावर असतात तसे घुमटाकार दरवाजे आहेत. पण प्रत्येक दरवाज्याचे नक्षीकाम आणि आकार वेगवेगळे आहेत.  

महादरवाजा किंवा मुख्य दरवाजा 




पिराचा  दरवाजा 




या दोन दरवाजांमधून आत आलं कि तुम्हाला तानाजी मालुसरे उद्यानाचा दर्शन होईल. नरवीर तानाजी मालुसरेंच्या नावाने तयार करणयात आलेलं हे उद्यान आणि गडावर तयार केलेली इतर उद्याने पाहिल्या नंतर, किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने शासन काही सकारात्मक पाऊले उचलत आहे असा विश्वास वाटतो. असलेल्या जागेचा पुरेपूर वापर करून हि उद्याने सुंदर पद्धतीने सुशोभित करण्यात आलेली आहेत.


इथून पुढे गेलं कि अनखी दोन दरवाजे लागतात.

हत्ती दरवाजा 



४)मेणा दरवाजा 




मेणा दरवाजामधून आल्या नंतर, आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात पोहोचतो. इथे आपल्याला शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाण्यासाठी दिशा दर्शक फलक दिसतो, डाव्या बाजूला पायऱ्या चढून आजून वर गेल्या नंतर शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे.


पण तिकडे न जाता सरळ थोडं पुढे गेलं कि महाराजांना शिवाजी हे नांव ज्या शिवाई देवीच्या नांवावरून मिळालं, त्या शिवाई देवीचं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळेल. किल्ल्याची भ्रमंती करण्याची सुरुवात देवीच्या पवित्र दर्शनाने तुम्ही करू शकता. मंदिराच्या बाहेरच तुम्हाला शाळेत इतिहासाचं मुखपृष्ठावर जे चित्र होत ते चित्र चितारलेला दिसेल (टीप: आता मुखपृष्ठ बदललं असेल बहुतेक पण आम्हाला हेच होत), ते चित्र पाहिल्या नंतर शिवाजी महाराजांचा इतिहास शिकताना जी उत्सूकता आणि उत्कटता असायची त्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतील. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ अशी मंदिराची वेळ असून, या वेळेत नेमून दिलेले पुजारी या मंदिराची देखभाल करत असतात.




देवीचं दर्शन घेतल्या नंतर किल्ल्याच्या दुसऱ्या आणि मुख्य भागात जाण्यासाठी पुढे आणखी चढाई करावी लागते. बनवलेल्या पक्क्या दगडी पायऱ्यांवरून पुन्हा वर गेलं कि आणखी एक दरवाजा लागतो.

कुलूप दरवाजा






कुलूप दरवाजा हा गडाच्या चढाई मधला शेवटचा दरवाजा आहे. तिथून थोडं वर गेलं कि गडाच्या मुख्य भागात पोहोचतो. गडावर पोहोचल्या पोहोचल्या आपले स्वागत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले जिवा महाला उद्यान करते.




आधी सांगितल्या प्रमाणे हे उद्यानही असलेल्या जागेचा पुरेपूर वापर करून सुंदर पद्धतीने सुशोभित करण्यात आलेल आहे. चढाई करून दमलेला असाल तर थोडा वेळ इथे आराम करून तुम्ही पुढे नव्या जोमाने सुरुवात करू शकता. इथून थोडं पुढे गेलं कि अंबरखाना लागतो. अंबारखाना म्हणजे धान्याचे कोठार.



पाण्याचे महत्व ओळखून पाणी साठवण्याच्या दृष्टीने केलेल्या अनेक टाक्या आपल्याला गडावर पाहायला 
मिळतील त्यापैकी गंगा-जमुना टाक्या पुढे तुम्हाला पाहायला मिळतील.



गंगा-जमून टाक्या जवळच तुम्हाला राजमाता जिजाऊ उद्यान पाहायला मिळेल. इतर उद्यान प्रमाणेच हे पण एक सुंदर उद्यान आहे.




पुढे गेलं कि तुम्हाला राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचा पुतळा असलेलं एक मंदिर पाहायला मिळेल.






या मंदिराच्या बरोबर समोर थोड्या अंतरावर तुम्हाला शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला ते स्थान दिसेल. श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म ठिकाण जे लाखो मराठी लोकांचं नतमस्तक होण्याचं ठिकाण आहे. ज्या ठिकाणहून स्वराज्य सूर्याचा उदय झाला ते ठिकाण पाहून तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी एक नवी ऊर्जा एक नाव चैतन्य नक्कीच मिळेल. हि एक दोन माजली इमारत असून खालच्या मजल्यावर शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. वरच्या मजल्यावर बैठकीची आणि देखरेखीची व्यवस्था आहे असं दिसत. 









छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचं पवित्र दर्शन केल्याची अनुभूती घेतल्या नंतर पुढे आपल्याला त्याकाळी पाणी साठवण्यासाठी तयार केलेल्या विशाल असा बदामी तलाव पाहायला मिळेल.




इथेच जवळपास आपल्याला त्याकाळी राहण्यासाठी आणि इतर उपयोगासाठी तयार केलेल्या पण कालानुरूप मोडकळीस आलेल्या विविध पुरातन वास्तू आपल्याला पाहायला मिळतील. बरोबरच आपल्याला मुघल काळातील एका मशिदीचे पण अवशेष पण पाहायला मिळतील.




प्रत्येक गडावर गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी कडेलोट टोकाची व्यवस्था असते. त्याचप्रमाणे शिवनेरी किल्ल्यावरही कडेलोट टोक आहे. गडाच्या एकदम उत्तर दिशेला तुम्हाला कडेलोट टोक पाहायला मिळेल. 






गडावर भ्रमंती करत असताना सभोवतालच्या खाली वसलेल्या जुन्नर शहराचे, सह्याद्रीच्या पर्वरांगांचे आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचे तुम्ही मनसोक्त दर्शन घेऊ शकता. 









शासनातर्फे गडाच्या डागडुजीचे आणि संवर्धनाची कामे चालू आहेत. खूप साऱ्या सुधारणा करून पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा खूप चांगला प्रयत्न आहे. काय-काय सुधारणा झाल्या आहेत त्यासंबंधीचे "पूर्वी आणि आता" अश्या आशयाचे फलक लावले गेलेले आहेत.


तसेच गडाच्या पायथ्याशी "शिवसृष्टी" नावाचं शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र उलघडणारे छोटस उद्यानहि महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमा अंतर्गत बनवलं गेलं आहे. परतीच्या प्रवासात तुम्ही तिथेही भेट देऊ शकता. 


अश्या पद्धतीने श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान अनुभवून आणि त्याच्या खूप साऱ्या आठवणी मनामध्ये आणि तुमच्या जवळ असलेल्या कॅमेऱ्यामध्ये साठवून तुम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागू शकता.

पुढचा टप्पा - तोरणा किल्ला

टीप - माहिती किंवा प्रवासवर्णन लिहीत असताना काही चूक झाली असल्यास माफी असावी आणि ती चूक सुधारण्या साठी मदत करावी.