बायको नावाचे एक
अजब रसायन असते
नवरा नावाच्या सैरभैर वादळाला
नेहमीच दिशा दाखवत असते
"मी आहे म्हणून टिकले,
दुसरी कोणी असती तर सोडून गेली असती"
असे म्हणून भांड भांड भांडते,
पण जेवायची वेळ होताच
न बोलता ताट पुढ्यात ठेवते
संसाराच्या गाड्याने जीव थकता
म्हणते "माहेरी जाऊन येते"
माहेरी जाताच "माझ्याविना ह्यांचे कसे होणार?"
या विचाराने तिचेच मन तिला खाते
प्रेमाच्या बंधनात ती
सारे दुःख विसरून जाते,
सुखाच्या पाऊलखुणा सोडत,
नात्याला उजळवते।