शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

मानवी संवेदनशीलता कुठे तरी हरवत चाललो आहोत का?

डिसेंबर २०१९ च्या सुरुवातीची हि घटना आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथे 'अमृत' योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचा जवान शहीद झाला, तर एक कामगार ढिगाऱ्याखाली गाडला गेला. गाडल्या गेलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून अग्निशामक दलाचे जवान ढिगाऱ्याखाली अडकले. अडकलेल्या कामगारासाठी 'एनडीआरएफ' व 'सीएमई'च्या जवानांकडून मदतकार्य सुरू होते.

दापोडी येथील विनियार्ड चर्चजवळ असलेल्या पाण्यांच्या टाक्यांशेजारी केंद्र सरकारच्या 'अमृत' योजनेंतर्गत मोठी ड्रेनज लाइन टाकण्याचे काम महापालिकेकडून ठेकेदारामार्फत सुरू आहे. तीस फूट खोल, पाच फूट रुंद तर ३० फूट लांब असा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात काम करताना दोन कामगार माती अंगावर पडल्याने गाडले गेले. त्यामुळे या दोघांना बाहेर काढण्यासाठी दोन स्थानिक युवक खड्ड्यात उतरले. मात्र, भुसभुशीत झालेली माती या दोघांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाची एक गाडी व जवान घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांच्याकडून मदतकार्य राबविले जात होते. स्थानिक युवकांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बघ्यांच्या गर्दीने खड्ड्यातून बाहेर काढलेल्या मातीचा ढिगारा जवानाच्या अंगावर कोसळला. यात तीन जवानांसह कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तत्काळ ही माहिती पोलिस आणि अग्निशामक नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या १० गाड्या, ५ रुग्णवाहिका व पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. बाहेर काढल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अग्निशामक विभागाने एनडीआरएफ आणि लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाला मदतीसाठी पाचारण केले होते. ही दोन्ही पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर या पथकांनी मदतकार्य हाती घेतले.

मदत कार्य सुरु असताना बघ्यांची वाढलेली गर्दी आणि त्यामुळे कोसळलेला मातीचा ढिगारा यांच्यामुळे आत अडकलेल्या लोकाना आपले प्राण गमवावे लागले. बहुतेकदा अश्या ठिकाणी जमलेल्या गर्दीची मानसिकता बघे आणि उत्सुकता अशी असते. पण या बघ्याच्या आणि उत्सुकतेच्या भूमिकेपोटी कुणाचा जीव जाणार असेल तर ते कितपत योग्य आहे? आपल्याला त्या ठिकाणी काही मदत करता येणार नसेल तर ठीक आहे पण मदतकार्यात अडथळा न आणण्याच काम तरी आपण करू शकतो कि नाही? 

हि एक घटना उदाहरण म्हणून झाली, पण रोजच्या जीवनात आपण अशी किती तरी उदाहरण पाहात असतो. रस्त्याच्या बाजूला काही खुदाईचे वैगेरे काम चालू असेल तर झालेली बघ्यांची गर्दी आपण कित्येकदा पहिली असेल. अश्या गर्दीमुळे वाहतुकीला साहजिकच अडथळा निर्माण होतो आणि ट्रॅफिक जॅम होतो. अश्या वेळी एखादी ऍम्ब्युलन्स किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्यासाठी जाणारी अग्निशामक दलाची गाडी अश्या ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे हॉस्पिटल मध्ये किंवा घटनास्थळी नियोजित वेळेत पोहोचली नाही आणि ऍम्ब्युलन्स मधील किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांमधील काहींना आपला जीव गमवावा लागला तर याला जबाबदार कोण? देशात राहात असताना एक व्यक्ती म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण कधी स्वीकारायला शिकणार आहोत? अश्या वेळी एक प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहतो तो म्हणजे, यांत्रिकीकरणाच्या या युगात आपण आपली मानवी संवेदनशीलता कुठे तरी हरवत चाललो आहोत का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा