काय वाटत असेल रुक्मिणीला,
जेव्हा सर्व म्हणतात राधा-कृष्ण,
जीवनसंगिनी असूनही तिला,
त्याच्या नावासाठी राहावं लागते तृष्ण…
राधेच्या प्रेमाच्या कथा रंगतात,
कृष्णाच्या बासरीचे सूर वाजतात,
पण रुक्मिणीच्या मनातले प्रश्न,
का कधी कुणाला जाणवतात?
तिने कधी हक्क गाजवला नाही,
मनातलं दुःख कधी बोलून दाखवलं नाही,
कृष्णाची पत्नी असूनही जगाने,
तिच्या प्रेमाला कधी नाव दिलं नाही.
राधा-कृष्ण म्हणताना जग हरखून जातं,
पण रुक्मिणीचं मन कुठेतरी हळवं होतं,
ज्याच्या नावाशी तिचं आयुष्य जोडलं गेलं,
त्याच्याच नावात तिचं अस्तित्व हरवून जातं.
कदाचित म्हणूनच तिचं प्रेम,
इतकं शांत… इतकं खोल आहे,
राधा-कृष्णाच्या कथेत हरवलेलं,
रुक्मिणीचं प्रेम अनमोल आहे.
कारण प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही,
कधी कधी स्वतःला विसरणं असतं,
आणि रुक्मिणीचं कृष्णावरचं प्रेम,
कदाचित म्हणूनच अनामिक राहतं… ❤️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा